अकोला : समलिंगी या प्रकाराबाबतच समाजात अतिशय दबक्या आवाजात बोलले जाते. समलिंगी संबंध ठेवणार्यांचे राहणे, वागणे, बोलणे हे सर्वसामान्य व्यक्तीसारखेच आहे. कुठल्याही अंगाने ते स्त्रैण नाहीत, त्यांच्या बोलण्यातही तसे दिसत नाही. त्यामुळे समलिंगी कोण हे सरसकटपणे दैनंदिन व्यवहारावरून ओळखणे कठीण आहे. मात्र, ज्यांना अशाप्रकारे बाह्यस्वरूपात ओळखता येते, त्यांच्यासाठी समाजाची मानसिकता ही हेटाळणीची आहे. आम्ही माणसंच आहोत, आम्हाला माणसुकीची वागणूक द्या, ही अपेक्षा अनेक समलिंगींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. समलिंगी संबंध ठेवणार्या अनेक उच्चपदस्थ अधिकार्यांकडूनही आम्हाला हेटाळणीची वागणूक मिळते, असा आरोप एका चाळीशीच्या उंबरठय़ावरील कोतीने केला. याची कथा तर भन्नाट आहे. तरुणपणामध्येच अशी लत लागली, एका मित्राच्या सोबतीने या मार्गावर आलो, मग अशा लोकांची एक यादी बनविली. त्या यादीमधील मित्राची संख्या वाढतीच असल्याने आता ती डायरीमध्ये रूपांतरित झाली आहे. प्रत्येकाला एक कोड नाव दिले असून, त्याला एखादा गुप्तरोग झाल्यास त्याच्या नावावर फुली मारली जाते, असे सांगितले. बसस्थानक परिसर, सिटी कोतवाली समोरच्या बगीच्यात अशा अनेक ठिकाणी समलिंगींचे अड्डे आहेत. विशेष म्हणजे वर्तमानपत्रात येणार्या घडामोडींचे अपडेट ते ठेवतात. एखादा गुन्हा घडला, तर त्या गुन्हेगाराची माहिती चघळताना तो कोती किंवा पंथी मार्गी असेल, तर मग त्याच्या आठवणीची चर्चा जोरात असते. यामध्ये आता शिकलेल्या युवकांसोबतच अनेक व्यवसायातील कामगार व सरकारी नोकर असलेल्या लोकांचाही मोठा समावेश आहे. त्यामुळे समलिंगींचा एक वेगळा वर्ग संघटित होत आहे. यामधील काही युवक खुलेपणाने समाजात वावरत आहेत.आमच्याही समस्या आहेत, सरकारने एनजीओंच्या मदतीने सुरू केलेले आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये समलिंगीसाठी स्वतंत्र असा कार्यक्रम नाही, याची खंत अनेकांना आहे. आमची ती नैसर्गिक वृत्ती आहे, तिला हीन कसे समजता, असा सवाल विचारात येणार्या काळात हा स्वतंत्र वर्ग समाजात खुलेपणाने मिरवेल तेव्हाच आमच्याकडे लक्ष वेधल्या जाईल, असा इशारा देण्यासही ही मंडळी कचरत नाहीत. एचआयव्हीचा सर्वाधिक धोका! एचआयव्हीचा सर्वाधिक धोका हा समलिंगी संबंध ठेवणार्यांना आहे. वैद्यकीय भाषेत त्याला ह्यहाय रिस्क कम्युनिटीह्ण असे संबोधतात. अकोल्याचा विचार केला तर समलिंगींच्या यादीमधील ६१५ लोकांमध्ये ३१ लोकांना एचआयव्हीची बाधा झालेली आहे. हीच संख्या बुलडाण्यात 0४ व वाशिम 0५, अमरावती 0४, यवतमाळामध्येही १२ इतके समलिंगी हे एचआयव्ही बाधित असून, सध्या ते उपचार घेत आहेत. समुपदेशनाच्या प्रक्रियेला गतिमान करण्यावर भर जिल्हा एडस् नियंत्रण कक्षाच्या सोबतच समलिंगी व सेक्स वर्कर महिलांसाठी समुपदेशन तसेच उपचाराबाबत आरोग्य विभागाकडून कार्यक्रम राबविला जातो. यासाठी प्रत्येक शहरांमध्ये एनजीओचीही निवड केली आहे. या प्रक्रियेला आणखी गतिमान करण्याचा विचार केला जात आहे. विशेष म्हणजे ज्यांना आपली ओळख लपवायची नाही, अशा लोकांसाठी रोमिओ प्लॅनेट नावाने व्हॉट्स अँप ग्रुपही सुरू केला जाणार असल्याची माहिती आहे.
हेटाळणी नको, माणुसकीची वागणूक द्या!
By admin | Published: August 05, 2016 1:43 AM