लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगाम-२०१७ बाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आढावा घेतला. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांची कमतरता भासू देऊ नका. पीक विम्याबाबत जनजागृती करून पीक विम्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा. कर्जमाफी निकषांचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्री यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे, अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, अकोलाचे उपविभागीय कृषी अधिकारी ए.डी. कुलकर्णी, आत्माचे प्रकल्प संचालक सु.ल. बावीस्कर, महाबीजचे व्यवस्थापक क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापक प्रकाश राठोड, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अरुण गावंडे आदींसह सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सातही जिल्ह्यात आजपर्यंत झालेले पर्जन्यमान, पीक पेरणी, तक्रार निवारण कक्ष, खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री व उपलब्धता तसेच तक्रारी, कृषी यांत्रिकीकरण, पीक विमा तसेच दुबार पेरणी याबाबत तालुकानिहाय आढावा घेतला. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासू देऊ नका, अशी सूचना करून पालकमंत्री म्हणाले की, बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. गैरप्रकाराची तक्रार आल्यास भरारी पथकाने तत्काळ कारवाई करावी. बियाणे, खते, कीटकनाशकांची पारदर्शक पद्धतीनेच विक्री करण्यात यावी, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. पीक विम्याच्या कक्षेत शेतकऱ्यांना आणण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती करून वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. अकोला जिल्ह्यात एकूण सरासरी पर्जन्यमान ६९७.३ मिमी आहे. १३ जुलै २०१७ पर्यंत १६३.८ मिमी इतका पाऊस झाला आहे. पेरणीचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ४,८३,८८० हेक्टर इतके असून सध्या २,५७,४५४ हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अवैधरीत्या बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर तालुकानिहाय सात भरारी पथकांची स्थापना केली आहे. याच पद्धतीने तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली.सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आठवड्यातुन कमीतकमी दोन दिवस प्रत्यक्ष स्थळी पाहणी करावी. तसेच नजर अंदाज नोंदी यांची प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा कराव्या जेणेकरून तुरी प्रमाणे अंदाज चुकणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.- रणजित पाटील, पालकमंत्री
बियाणे, खते, कीटकनाशकांची कमतरता भासू देऊ नका
By admin | Published: July 15, 2017 1:26 AM