हातरुण : यंदा खरीप हंगामात बाळापूर तालुक्यातील १९,७४२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. कापूस वेचणीला आलेला असताना बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. या कपाशी पिकाची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर कापसाच्या पिकाचे बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा अहवाल बाळापूर कृषी विभागाने वरिष्ठ कार्यालयाला पाठवला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फर्दळीचे उत्पन्न घेऊ नका तसेच कपाशीचे पीक नष्ट करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बाळापूर तालुक्यात सर्वत्र बोंडअळीने कपाशी पिकावर थैमान घातले. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी संकटात आहे. सततच्या पावसाने कापसाची बोंडे सडणे आणि गुलाबी बोंडअळी यामुळे कापसाचे उत्पन्न घटले आहे. कापूस वेचणीला आलेला असताना बोंडअळीचा फटका बसला. त्यामुळे कापसाच्या पिकाला लावलेला खर्च वसूल झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हातरुण, शिंगोली, मालवाडा, अंदुरा भाग एक, अंदुरा भाग दोन, मंडाळा, लोणाग्रा, हातला, मांजरी परिसरात कपाशी पिकावर बोंडअळीने कहर केल्याने बाळापूर तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने, कृषी सहायक एस.डी. गावीत यांनी थेट बांधावर जाऊन पीक पाहणी केली होती.
यावर्षी कपाशीला पेरणी, मशागत, कीटकनाशक फवारणी, वेचणी असा मोठा खर्च लागला आहे. मात्र दिवाळीपूर्वीच कपाशीवर बोंडअळी आल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. कापसाची शेती शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आहे. फर्दळीचे पीक घेऊ नये तसेच बोंडअळीग्रस्त कपाशी पीक नष्ट करण्याचे आवाहन बाळापूर तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी केले आहे.
बॉक्स...
बोंडअळी नुकसानीची मदत देण्याची मागणी
हातरूण शेतशिवारात बोंडअळीने कापसाच्या पिकावर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. महागडे कीटकनाशक फवारणी करूनही बोंडअळी गेली नाही.
पिकाला मोठ्या प्रमाणात खर्च लागला. लावलेला खर्च वसूल होणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पीक उपटून फेकले. पिकावर रोटावेटर फिरवले. तसेच शेतातील पिकात जनावरे सोडली. हातरूण येथील शेतकऱ्याने बांधावर कपाशी पेटवली होती. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर शेतकऱ्यांसह बाळापूर तहसीलवर धडकले होते. बोंडअळीने ग्रस्त कपाशी अधिकाऱ्यांना दाखवत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या.
कोट...
बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशी पीक नष्ट करण्याची गरज असून, फर्दळीचे उत्पन्न घेऊ नका. काढलेल्या पराटीपासून कंपोस्ट खत बनवण्यावर भर द्यावा. बाळापूर तालुक्यात कपाशी फर्दळ निर्मूलन अभियान राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना उपाययोजना करण्याबद्दल माहिती देण्यात येत आहे.
- नंदकुमार माने, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर