लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामात कुचराई केल्यास गय केली जाणार नाही, असे सांगत पूर्ण झालेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांचा ताळेबंद तातडीने सादर करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील जिल्ह्यातील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. ‘जलयुक्त शिवार’ची कामे प्रामाणिकपणे करण्याचे सांगून, कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे सांगत सन २०१५-१६ मधील अपूर्ण कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करून, ‘जलयुक्त शिवार’च्या कामामुळे निर्माण होणारा पाण्याचा साठा, पाण्याचा वापर इत्यादी संबंधीचा ताळेबंद तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामांचा ताळेबंद सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला. सन २०१६-१७ मधील जलयुक्त शिवारची कामे येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करून, गावे जलयुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू. बोके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, कृषी सहायक व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दहा हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करा!‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात दहा हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देत, शेततळ्यांच्या कामांसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.गाळ काढण्याच्या कामांसाठी ग्रामस्तरीय बैठका घ्या!शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० गावतलाव आणि १० पाझर तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन, शेतकऱ्यांना गाळ शेतात नेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करावयाची असून, गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्डच्या डिझेलचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.गावनिहाय कामांचा आराखडा प्रस्तावित करा!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात करावयाच्या कामांसाठी गावांची निवड करून, गावनिहाय आवश्यक असलेल्या कामांचा आराखडा तातडीने प्रस्तावित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीत दिले.
‘जलयुक्त’च्या कामात कुचराई केल्यास गय नाही!
By admin | Published: May 17, 2017 2:05 AM