अकोला, दि. ४ : कोचिंग क्लासच्या आजच्या काळात विद्यार्थ्यावर स्वत:च्या मुलापेक्षा जास्त प्रेम करणारा व चक्क मोफत करिअर गाइडन्स करणारा शिक्षक ही दुर्मीळ बाब झाली आहे. परंतु अकोल्यात सेवाभावी वृत्तीने विद्यार्थ्यांंना शिकवणारे पी.एम. परनाटे यांनी आयुष्यात कधीही धनाची अपेक्षा न करता सर्व विद्यार्थ्यांंना मोफत मार्गदर्शन केले. त्यांना हृदयविकारासह काही असाध्य व्याधी जडल्याने त्यांच्या अनेक डॉक्टर शिष्यांनी एकत्र येऊन त्यांचे प्राण वाचवून जगावेगळी गुरुदक्षिणा दिली. पी.एम. परनाटे हे त्यांच्या विद्यार्थ्यांंचे सवरेत्तम करिअर घडविण्यासाठी धनाची अजिबात अपेक्षा न बाळगता सतत धडपडणारे अजब व्यक्तिमत्त्व आहे. आठवीपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापयर्ंत सर्व विद्यार्थ्यांंना विनामूल्य मार्गदर्शन करणे, हेच मिशन माणून ते झटत आले. परंतु अशा ऋषितुल्य व्यक्तीचेही नशीब परीक्षा पाहत असते. त्यांना हृदयविकारासह इतरही काही असाध्य व्याधी जडल्या. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी स्थानिक ओझोन हास्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. परनाटे हे दोन तासांपेक्षा अधिक काळ वाचणार नाहीत, असा निर्वाणीचा इशारा उपचार करणार्या डॉक्टरांनी दिल्याने त्यांचे विद्यार्थी राहिलेले डॉक्टर हादरून गेले. परंतु अखेरच्या क्षणी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्जन असलेले डॉ. निकेतन जांभुळकर, ओझोनचे मुख्य संचालक डॉ. विनीत हिंगणकर, डॉ. प्रशांत वायचाळ, डॉ. सदानंद भुसारी, डॉ. आरती कुलवाल, डॉ. पंकज पाटील, डॉ. भरत पटोकार, डॉ. वंदना पटोकार, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. रूपेश राठी, डॉ. नरेंद्र भागवत, डॉ. महेंद्र चांडक यांनी डॉ. रणजित सपकाळ व डॉ. अरविंद आडे यांच्या मार्गदर्शनाखाली परनाटे यांच्यावर दोन यशस्वी शस्त्रक्रिया करून मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणत त्यांचे प्राण वाचविले. ही बाब त्यांच्या देशभरात व देशाबाहेर राहणार्या विद्यार्थ्यांंना कळताच त्यातील अनेकांनी अकोला गाठून त्यांची भेट घेतली. परनाटे यांच्यावरील उपचारासाठी एकूण सात लाख रुपयांचा खर्च आला. परंतु त्यांचे शिष्य राहिलेल्या सर्व डॉक्टरांनी व डॉ. विनीत हिंगणकर यांनी त्यांच्यावर मोफत उपचार करून त्यांना आगळीवेगळी गुरुदक्षिणा दिली. त्यांना शुक्रवारी हॉस्पिटलमधून सुट्टी झाली.
डॉक्टर शिष्यांनी वाचविले शिक्षकाचे प्राण!
By admin | Published: September 05, 2016 2:41 AM