अकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अकोट येथील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी मनोज प्रभुदास तेलगोटे हा युवक हॉस्पिटलमध्ये मरण पावल्यावरही त्याला आॅक्सिजन लावून अकोला येथे उपचारार्थ पाठवून मृतदेहाची अवहेलना केली, तसेच मृताच्या उपचाराच्या कागदपत्रांचे बनावटीकरण करण्यात आल्याच्या आरोपाखाली डॉ.जपसरे यांच्यावर अकोट शहर पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रभुदास तेलगोटे यांचा मुलगा मनोज याला अकोट येथील जपसरे हॉस्पिटल अॅण्ड क्रिटिकल केलर सेंटरमध्ये २१ एप्रिल रोजी भरती केले. या ठिकाणी उपचारादरम्यान २२ एप्रिल रोजी मनोजचा मृत्यू झाला. तरीसुद्धा डॉ.कैलास जपसरे यांनी त्याला आॅक्सिजन लावून अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याकरिता नातेवाइकांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी अकोला येथे उपचारार्थ नेले असता, तेथे ईसीजी काढल्यानंतर तो मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशा आशयाची फिर्याद मनोजच्या वडिलांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला ५ मे रोजी दाखल केली. यामध्ये त्यांचा मुलगा मनोज हा रेल्वेमध्ये नोकरीवर लागल्यापासून तर त्याच्यावर करण्यात आलेले उपचार व मृत्यूपर्यंत सविस्तर माहिती फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली. या फिर्यादीवरून अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी या घटनेची गांभीर्याने चौकशी केली. या प्राथमिक चौकशीमध्ये डॉ.कैलास देवीदिन जपसरे यांनी मृत मनोज तेलगोटे मरण पावल्यानंतरही त्याला व्हेंटीलेटर व आॅक्सिजन लावून अकोल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये रवाना करून मृतदेहाची अवहेलना करीत मृताच्या नातेवाइकांच्या भावनांना ठेच पोहोचविली. मृत मरण पावल्यानंतरही उपचाराच्या कागदपत्राचे बनावटीकरण करून सदरचे बनावट कागदपत्रे खरे असल्याचे भासवून गैरहेतूने उपयोग केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फिर्यादीची लेखी तक्रार व बयानावरून आरोपी डॉ.कैलास जपसरे यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात भादंवि २९७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने जामीन फेटाळून त्यांची कारागृहात रवानगी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)फोटो