कोरोनाच्या लसीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे, मात्र पहिल्या टप्प्यात ही लस डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सात हजारापेक्षा जास्त डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी लसीच्या इनसाइड इन्फेक्शनच्या भीतीने काही डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात लस घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अकोल्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी लसीकरणासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात शासकीय तसेच खासगी डॉक्टरांसोबत चर्चा केली असता, काही डॉक्टरांमध्ये लसीसंदर्भात संभ्रमाची स्थिती होती, मात्र बहुतांश डॉक्टरांनी पहिल्याच टप्प्यात लस घेणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर कर्मचाऱ्यांची काय भावना
लसीकरणासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी सज्ज असले तरी काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांमध्ये लस घेतल्यानंतर इनसाइड इफेक्टची भीती दिसून आली. विशेषत: ज्यांना मधुमेह, रक्तदाब यासारख्या आजाराचा त्रास आहे. परंतु ज्यांना कुठलाच त्रास नाही, अशांकडून लसीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे.
जिल्ह्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लससाठी नोंदणी केली -७,७८३
शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण होत आहे. जिल्ह्यातील आयएमए डॉक्टर्स ही लस घेणार आहेत, मात्र ज्यांना शुगर, रक्तदाब यासारखे आजार असतील, अशांना वैद्यकीय चाचणीनंतरच लस देऊ. वैद्यकीय कर्मचारी लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
- डॉ. पगार गवई, सचिव, आयएमए, अकोला