अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती, मात्र मनुष्यबळ कमी होते. त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली, मात्र कोविड काळात केवळ सातच डॉक्टर रुजू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली. फेब्रुवारी महिन्यात कोविडची दुसरी लाट आली. त्यात गंभीर रुग्णांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र दिसून आले. रुग्णसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह डाॅक्टरांची संख्याही कमी पडू लागली. त्यामुळे आराेग्य विभागामार्फत कंत्राटी तत्त्वावर पदभरती करण्यात आली. इतर आरोग्य कर्मचारी मिळाले; मात्र कोविड काळात डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. तीन ते चार वेळा पदभरतीची जाहिरात काढल्यानंतरही डॉक्टर मिळत नसल्याची स्थिती होती. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सुमारे ५० डॉक्टरांची कोविड काळात नियुक्ती करण्यात आली होती; मात्र त्यापैकी केवळ ७ डॉक्टरांनीच नियुक्ती स्वीकारत रुग्णसेवेला सुरुवात केली.
कोरोना काळातील एकूण नियुक्त्या - ५०
शहरी भागातील नियुक्त्या - ३०
हजर झाले किती - ५
ग्रामीण भागातील नियुक्त्या - १०
हजर झाले किती - २
४३ जागा रिक्त
सद्य:स्थितीत कोविडची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा भारही कमी झाला आहे, मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत नियुक्त केलेल्या ५० पैकी केवळ सात डॉक्टरांनी नियुक्ती स्वीकारत रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यामुळे ४३ जागा रिक्त असल्याची माहिती आहे.
कारणे काय
अनेक डॉक्टरांचा ग्रामीण भागात रुग्णसेवेला नकार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही डॉक्टरांनी ग्रामीण भागात रुग्णसेवेकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.
शासकीय सेवेच्या तुलनेत खासगी सेवेत मानधन जास्त मिळत असल्याने बहुतांश डॉक्टरांचा ओढा खासगी प्रॅक्टिसकडे आहे. अत्यल्प मानधनामुळे देखील अनेक डॉक्टरांनी शासकीय सेवेत रुग्णसेवा देण्यास नकार दिल्याचे दिसून येते.