लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १५ मार्च ते १९ मे २०१७ या कालावधीत राबविण्यात आलेल्या रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेंतर्गत विविध नियमांचे उल्लंघन व त्रुटी आढळून आलेल्या जिल्ह्यातील १०४ डॉक्टरांनी आता त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात त्रुटींची पूर्तता करणारी कागदपत्रे सादर केली असून, ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यात १५ मार्च ते १९ मे २०१७ या काळात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वातील पथकांनी रुग्णालय तपासणीची धडक मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत शहर व ग्रामीण भागात एकूण १३४ रुग्णालये, दवाखान्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १०४ रुग्णालये, दवाखान्यांमध्ये विविध नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच विविध त्रुटी आढळून आल्या. यामध्ये बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट, अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची पदवी नसतानाही त्या पॅथीची प्रॅक्टिस करणे, बायोमेडिकल वेस्ट अॅक्ट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसणे, रुग्णांचे केस पेपर नसणे अशा विविध त्रुटी आढळून आल्या. याबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या चमूने गत महिन्यात २० मे रोजी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सादर केला. त्यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी त्रुटी सादर करा, अन्यथा कारवाईस सामोरे जाण्यास सिद्ध राहा, असा कठोर इशाराच डॉक्टरांना दिला होता.तेव्हापासून त्रुटी आढळलेल्या डॉक्टरांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही डॉक्टरांनी त्यांच्याकडे आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करणारी कागदपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या कार्यालयात सादर केली आहेत. १० तारखेला निर्णयविविध त्रुटी व नियमांचे उल्लंघन आढळलेल्या डॉक्टरांकडून त्रुटींची पूर्तता करण्यात येत आहे. यासाठी त्यांना काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सर्व १०४ डॉक्टरांकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर शनिवार, १० जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत डॉक्टरांच्या भवितव्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.डॉक्टरांकडून त्रुटींची पूर्तता करणारी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १० तारखेला जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार असून, त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला.
त्रुटींची पूर्तता करण्यासाठी डॉक्टरांची लगबग!
By admin | Published: June 06, 2017 12:24 AM