अकोला: नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूळ दस्तऐवजाच्या पडताळणीला शनिवार २९ जूनपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवात झाली. ही प्रक्रिया ४ जुलैपर्यंत चालणार आहे.इयत्ता बारावी आणि नीट परीक्षेच्या निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आॅनलाइन अर्ज केले होते. हे अर्ज सादर करताना त्यांनी प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज आॅनलाइन अर्जासोबत सादर केले होते. जे विद्यार्थी नीट परीक्षेत १ ते ६० हजार आॅल इंडिया रँकिंगमध्ये आले होते त्यांच्या दस्तऐवजांची मूळ प्रत तपासण्यात येत आहे. ही प्रक्रिया शनिवार २९ जूनपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झाली. पहिल्याच दिवशी ४४० विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये एससी, एसटी, व्हीजे, एनटी-१, एनटी-२ आणि एनटी-३ यासह ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यात येत आहे. गुरुवार ४ जुलै रोजी एससी, एसटी, व्हीजे, एनटी-१, एनटी-२ आणि एनटी-३ यासह ओबीसी, एसबीसी, एसईबीसी या आरक्षीत प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मूळ दस्तऐवज तपासण्यात येणार आहेत.बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकोला केंद्रदस्तऐवज पडताळणीसाठी बुलडाणा आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे केंद्र देण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक माहितीसह त्यांचे समुपदेशनही करणार आहेत.नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी सादर केलेल्या दस्तऐवजांच्या मूळ प्रतीची पडताळणी सुरू झाली आहे. अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला