अकोला : ऐन पाणी टंचाईच्या काळात कौलखेड परिसरातील प्रभाग १९ मधील हातपंप, सबमर्सिबल पंपांचे जलस्रोत दूषित झाले आहेत. प्रभागातील मुख्य नाल्याची समस्या निकाली काढण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. प्रभागातून कोट्यवधींचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला. त्यामुळे आयुक्त साहेब, या रकमेतून किमान मुख्य नाल्याची समस्या निकाली काढण्यासाठी काहीअंशी आर्थिक तरतूद करता का, असा सवाल करीत स्थानिक रहिवाशांनी आंदोलनाचा गर्भित इशारा दिला आहे.कधीकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या कौलखेड परिसरावर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी प्रभाग १९ मधील भाजपाचे सर्व उमेदवार निवडून दिले. वर्षभराच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, बहुतांश नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्यांकडे पाठ दाखवणे पसंत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनपात सत्ता असली, तरी प्रभागातील विकास कामांचा अनुशेष दूर होत नसल्याची परिस्थिती आहे. प्रभागातील नागे लेआउट, पावसाळे लेआउट, प्रगती नगर, उन्नती नगर, कृष्ण नगरी, गायत्री नगर आदी परिसरात नाल्यांची मुख्य समस्या आहे. सर्वत्र कच्च्या नाल्या असल्यामुळे पावसाचे किंवा सांडपाणी वाहून जात नसल्याचे चित्र आहे. सांडपाण्यामुळे परिसरातील हातपंप, सबमर्सिबल पंपांचे जलस्रोत दूषित झाले आहेत. ऐन उन्हाळ््यात ही परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रभागाच्या नगरसेविका योगिता पावसाळे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्याचा दावा करीत असल्या, तरी समस्यांवर तोडगा निघत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. प्रशासनाने प्रभागातून कोट्यवधींचा मालमत्ता कर जमा केला आहे. त्यापैकी काही रक्कम नाल्याच्या बांधकामासाठी तरतूद करण्याची मागणी रहिवाशांनी केली असून, पावसाळ््यापूर्वी नाल्यांची समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य नाल्यासाठी ४० लाखांचा खर्चप्रभागात कच्च्या नाल्यांची मोठी संख्या आहे. यापैकी एका मुख्य नाल्याचे बांधकाम केल्यास उर्वरित नाल्यांची समस्या काहीअंशी निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी किमान ३५ ते ४० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. महापौर विजय अग्रवाल २० लाखांचा निधी देण्यास तयार असले, तरी उर्वरित निधीसाठी प्रशासनाच्या भूमिकेमुळे नाल्याचे काम रखडल्याची माहिती आहे.मुख्य नाल्याचे बांधकाम केल्यास प्रभागातील सांडपाण्याची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने नालीचा सर्व्हे करून तातडीने बांधकाम करावे. आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे.-योगिता पावसाळे, नगरसेविका प्रभाग १९