अकोट : गणेशभक्तांच्या सोयीसुविधांकरिता अकोट शहरात पाच ठिकाणी घरगुती गणपती विसर्जन संकलन केंद्र तयार करण्यात आले असून, २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २ या वेळेत सुरू करण्यात येत आहेत.
गणेश विसर्जनाकरिता गर्दी टाळण्यासाठी शहरातील श्री शिवाजी काॅलेज दर्यापूर रोड, यात्रा चौक, मोठे बारगण पान अटाई, सोनू चौक, गजानन नगर, गजानन मंदिर अंजनगाव रोड अकोट या ठिकाणी घरगुती गणपती विसर्जित करण्यासाठी गोळा केले जाणार आहेत. त्यानंतर सर्व गणेशमूर्ती विधिवत पूजा करून पोपटखेड धरणात विसर्जित करण्याची जबाबदारी पथक प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली. या पथकात नगर परिषद कर्मचारी तथा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी जारी केले. संकलन उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके, शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, शांतता समिती सदस्य यांनी केले आहे.