मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-आसरा फाट्यापर्यंत राज्य महामार्ग असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे; त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यासाठी २६ जानेवारीपासून येथील उड्डाण पुलावर गाढवाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा हम चालीस संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात नमूद आहे की, अमरावती, अकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या हिरपूरमार्गे ब्रह्मी-आसरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालकांना हाडांच्या व मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. तसेच अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. लोकप्रतिनिधी उदासीन असल्यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहे. रस्त्याची चाळण झाल्याने हिरपूरवासीयांना नाइलाजास्तव लांब अंतराच्या व जोखमीच्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या रस्त्याच्या कामासाठी हिरपूरवासीयांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्येक फाट्यावर लाक्षणिक उपोषणसुद्धा केले होते. त्याचा काहीही फायदा झाला नसल्याने आता २६ जानेवारी रोजी गाढवाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रशक्ती हम चालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव यांनी सांगितले. निवेदन देताना बबनराव डाबेराव यांच्यासह तालुकाध्यक्ष रोहित सोळंके, सचिव किशोर सोनोने, विजय राऊत, मोहंमद शहाबुद्दीन, आकबर ठेकेदार आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री, बाळापूर, दर्यापूर व येथील आमदार तसेच ठाणेदारांना पाठविण्यात आल्या आहेत.