तेल्हारा : तालुक्यातील अडसूळ-तेल्हारा, तेल्हारा-वरवट, तेल्हारा-वणी वारूळा व तेल्हारा-हिवरखेड या चारही मुख्य रस्त्यांचे काम रखडलेले असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करीत २१ जून रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर सामाजिक आंदोलन संघ व सम्राट युवक संघटनेने गाढव आंदोलन केले.
तेल्हारा शहराला जोडणारे चार मुख्य रस्ते असून, विकासाच्या नावाखाली या चारही रस्त्यांचे खोदकाम गत दोन-तीन वर्षांपूर्वी करून ठेवलेले आहे. यामध्ये तेल्हारा-अडसूळ, तेल्हारा-वरवट, तेल्हारा-वणी वारुळा व तेल्हारा-हिवरखेड रस्त्याचे काम रखडलेले आहे. या रस्त्यावर पिवळी माती तर काही ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवर चिखल झाला आहे. चिखलामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे. याबाबत काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र काम सुरू न झाल्याने सामाजिक आंदोलन संघ व सम्राट युवक संघटनेने गाढव आंदोलन केले. आंदोलनात सामाजिक आंदोलन संघाचे चंद्रकांत मोरे, सम्राट युवक संघटनेचे भारत पोहोरकार, विशाल वानखडे, राहुल सोनोने, मनोहर जवंजाळ, वानखडे गुरुजी, नंदू जवंजाळ, प्रवीण पोहरकार राहुल सावळे, संतोष चंदन, सतीश भोंडे, सचिन चिकटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (फोटो)