रडू नका.. दु:ख धुण्यासारखे धुवून टाका, उमेदीने उभे राहा - यशोमती ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:25 PM2020-02-29T18:25:48+5:302020-02-29T18:25:58+5:30
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांशी महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला.
अकोला: मी २८ वर्षांची असताना विधवा झाली, तेव्हा माझी मुले ३ आणि ४ वर्षांची होती. माझं जग संपलं, अस वाटायचं; पण माझ्या वडिलांनी मला धीर दिला अन् मी आज मंत्रिपदापर्यंत पोहोचली. मदत करायला मी देव नाही, संघर्ष संपता संपत नाही; पण जगण्याचे बळ तुम्ही मनोधैर्यातून उभारा.आरसा पाहून स्वत:चं कौतुक स्वत:चं करा.आयुष्यात आलेले दु:ख धुणे धुण्यासारखे धुवून टाकावे, पिळून टाकावे, झटकून टाकावे व पुन्हा उमेदीने उभे राहावे, संकटाला सामोरे जावे अशा शब्दात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांशी महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री अॅड.यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला.
अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा कुटुंबीयांचा संवाद मेळावा शनिवारी अकोला काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी भवनात झाला. अध्यक्षस्थानी काँग्रेचे जिल्हाध्यक्ष हितायत पटेल होते. मंचावर विजय अंभोरे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, देवानंद पवार,डॉ.सुधीर ढोणे, नातिकोद्दीन खतिब,बबनराव चौधरी, साजीद खान,अशोक अमानकर, डॉ.सुभाष कोरपे,संजीवनीताई बिहाडे ,साधना गावंडे, प्रदीप वखारिया, संजय बोडखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विचार हतबल होतात, कृती होत नाही. रडू नका, हिम्मतीने निर्धार करा मी माझ्यासाठी लढणार हा निर्धार करा असे आवहन करतानाच शासनाकडून जेवढी मदत देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न मी करेल. अशी ग्वाही ठाकूर यांनी दिली. समाजातील विधवा, परिपक्वता व एकल महिलासाठी शासनाच्या विविध योजना आहे. एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डॉ. सुधीर ढोणे आणि अशोक अमानकर यांनी केले. हितायत पटेल यांनी मेळाव्यातील मागण्याचे निवेदन वाचून काढले.सूत्रसंचालन आणि आभार तश्वर पटेल यांनी मानले.