अकोला : गणपती बाप्पा ही सर्वांच्याच लाडाची देवता आहे. बाप्पा घरी येणार याचे घरातील चिमुकल्यांना भारी कौतुक असतं. गुरुवारी सायंकाळी गणपती विसर्जनादरम्यान एका चार वर्षीय चिमुकल्याने रडून रडून अक्षरशः घसा कोरडा केला आणि सातव चौकातील जलकुंडात विसर्जनासाठी आणलेली बाप्पाची मूर्ती पप्पांना परत घरी घेऊन जावी लागली.
निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने जठार पेटीतील सातव चौकात गणेश विसर्जनासाठी जलकुंड तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी चार वर्षीय कियांश निलेश राठी (4) हा गणपती विसर्जनासाठी आला होता. त्याच्या वडिलांनी गणपतीची आरती करून मूर्तीचे विसर्जन केले. परंतु मुलाने एकच रडारड सुरू करून बाप्पाला परत आणण्याचा हा आग्रह धरला.
दरम्यान त्याला विसर्जन केलेली दुसरी गणेश मूर्ती आणून दिली तर त्याने ही गणेश मूर्ती आपली नसल्याचे सांगत ती घेण्यास नकार दिला. अखेर त्याच्या बाबांनी घराचीविसर्जित केलेली मूर्ती शोधून आणून त्याच्या हाती दिली. त्यानंतरही त्या मूर्तीला घेऊन त्याचे सारखे रडणे सुरू होते.