आजघडीला जवळपास प्रत्येकाकडेच ॲन्ड्राॅईड मोबाईल असून दहाअंकी मोबाईल क्रमांक बॅंक खात्याशी जोडलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने पैशाची देवाण-घेवाण करायची असल्यास खबरदारी म्हणून ओटीपी मागविण्यात येतो. तो कोणालाही ‘शेअर’ करू नये, असे आवाहन वारंवार केले जाते. त्यामुळे कुठल्याही अनोळखी माणसाच्या हातात मोबाईल दिल्यास तुमची नजर चुकवून ती व्यक्ती क्षणात बॅंकखाते साफ करू शकते. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक बनले आहे.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक...
कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन -
अनोळखी व्यक्ती कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन आणि तत्काळ ओटीपी मिळवून बॅंकेतील रकमेवर डल्ला मारू शकते.
लॉटरी लागली आहे असे सांगून -
तुम्हाला अमूक रकमेची लॉटरी लागली आहे आणि त्यासाठी ओटीपी सांगा, अशी बतावणी करून फसवणूक होऊ शकते.
वेगळी लिंक पाठवून -
तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे वेगळी लिंक पाठवून पैशाचे आमिष दाखविले जाऊ शकते. त्याद्वारे ओटीपीची मागणी होऊ शकते.
केवायसीसाठी आवश्यक असे सांगून -
बॅंक अधिकाऱ्याच्या नावाने फोन करून केवायसीसाठी ओटीपी आवश्यक असल्याची बतावणी होऊ शकते.
ही घ्या काळजी...
आपला ओटीपी कोणतीही बॅंक किंवा शासकीय अधिकारी कधीच मागत नाही. त्यामुळे ओटीपीसाठी कोणी काहीही कारण सांगतले तरी, तो कोणालाच शेअर करू नये.
एखादी अडचणीत असलेली अनोळखी व्यक्ती फोन लावण्यासाठी मोबाईल मागत असेल, तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णत: लक्ष ठेवायला हवे.
बॅंकेतील रकमेवर वक्रदृष्टी ठेवून असलेले ठग लाखो रुपयांचे आमिष दाखवून बॅंक डिटेल्स, ओटीपीची मागणी करतात. अशावेळी त्यांना प्रतिसाद देऊ नये.
मोबाईलच्या माध्यमातून भोळ्याभाबड्या लोकांना गंडविले जात आहे. सोशल मीडिया तसेच विविध प्रकारच्या लिंकच्या माध्यमातूनही बँकेतील रक्कम हडपल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाईलचा गैरवापर होणार नाही, याकडे प्रत्येकाने लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे.
- विलास पाटील, पोलीस निरीक्षक