अकाेला : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ६ जून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आता ६ जूनला भगवा ध्वज फडकवून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक दिन भगवा ध्वज उभारून साजरा करावा, याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्हाला शिवरायांचा एकपाती भगवा ध्वज मान्य आहे; परंतु स्व प्रतीकात्मक राजदंडावर उलटा कलश, गाठी, आंब्याच्या डहाळ्या याला विरोध आहे, या दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अशा प्रकारे धार्मिक अवडंबर करून कमी करू नये, अशी भूमिका मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा सचिव प्रशांत बुले यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी
आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये नियमावली देताना
भगवा स्वराज्यध्वज संहिता ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. हा ध्वज ३ फूट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदीपेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता, शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणून कमीतकमी १५ फूट उंचीचा वासा किंवा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ फुटांचा आधार द्यावा. यावेळी सुवर्णकलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकू, ध्वनिक्षेपक आदी साहित्याचा वापर करण्याच्या सूचना आहेत.
६ जून रोजी सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधून घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करून रयतेची झोळी सुख, समृद्धी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा ‘सुवर्णकलश’ बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तद्नंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत गाऊन सांगता करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
........
काेट...
राज्याचा कलश रयतेच्या झोळीत रिता करणे या अलीकडच्या ‘आलंकारिक’ वाक्याचा गैरफायदा घेत, प्रतीकात्मक राजदंडावर उलटा कलश, गाठी, आंब्याच्या डहाळ्या याला विरोध आहे. कारण शिवचरित्राच्या कोणत्याही समकालीन साहित्यात, असा उल्लेख नाही. अर्थात, असे करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या राजदंडाचा अवमान, तसेच शिवचरित्राचे, इतिहासाचे विकृतीकरण आहे. शासकीय कार्यालयात धार्मिक प्रतीके उभारण्यास बंदी असताना, सर्वधर्मसमभावी शिवछत्रपतींच्या नावाआडून ही धार्मिक प्रतीके लादून, शिवछत्रपतींच्या सर्वधर्मसमभावी भूमिकेचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शासनाने या शासन निर्णयात बदल करून नवीन आदेश काढावा.
-प्रशांत बुले,
मराठा सेवा संघ, अकोला