अकोला : जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ४३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, वारंवार लसीचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा फटका दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर दिसून येत आहे. पहिला डाेस व दुसरा डाेस हा एकाच लसीचा असला पाहिजे. मात्र, पहिला डाेस कोव्हॅक्सिनचा आणी दुसरा डाेस कोविशिल्डचा घेऊन शरीरात लसीचे काॅकटेल करू नका. असे केले तर राेगप्रतिकारशक्ती कमी हाेऊन शरीरासाठी अपायकारक ठरण्याची शक्यता अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दुसऱ्या डाेसचे सुमारे २० टक्केच लसीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास लाभार्थ्यांना पहिला डोस सहज मिळून जाईल. मात्र, दुसऱ्या डोससाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यामुळे वेगवेगळे डाेस घेण्याची कल्पना काेणीही करू नये. ते घातक ठरू शकते.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ६ लाख ५ हजार ३७६ लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यात मोठ्या उत्साहात कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला वैद्यकीय कर्मचारी व इतर फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी या माेहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरुवात होतच जिल्ह्यातील कोविड लसीकरण मोहिमेला गती मिळाली आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे ही गती मंदावली आहे.
.
अशी आहे लसीकरणाची स्थिती
उद्दिष्ट - ६,०५,३७६ (४३ टक्के)
झालेले लसीकरण
वयोगट - पहिला डोस - दुसरा डोस
ज्येष्ठ - ७८,६३३ (४० टक्के) - २६१३५ (१३ टक्के)
४५ ते ६० - ८५१५७ (२१ टक्के) - २०५२६ (५ टक्के)
(१८ ते ४५ - १७,३०५)
१ लाख १७ हजार लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
जिल्ह्यात एकूण लसीकरणाच्या सुमारे २० टक्केच लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले. त्यामुळे अद्यापही सुमारे १ लाख १७ हजार १२९ लोकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा कायम आहे. यामध्ये ५२,४९८, ज्येष्ठ, तर ४५ वर्षांवरील ६४ हजार ६३१ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून अकोल्यासह विभागात कोविड लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या डोससाठी लाभार्थ्यांना लसच उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.