अकोला: सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा उघडणार असून, इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत वर्ग सुरू होणार आहेत; परंतु मुलांना सर्दी, खोकला असेल तर त्यांना शाळेत पाठवून नका असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
मागील सात ते आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा उघडणार आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविताना पालकांना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे मुलांना सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्यांना शाळेत पाठवू नका, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. लक्षणे असणाऱ्या मुलांना पालकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यास सर्दी, खोकला बसल्यावरच त्याला शाळेत पाठवावे, असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांनी हे करावे
- सर्वच विद्यार्थ्यांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
- नियमित मास्कचा वापर करावा.
- वारंवार हात धुवावे.
- शक्य असल्यास सॅनिटायझर सोबत ठेवावे.
- वारंवार नाकातोंडाला हात लावू नाही.
- इतर मित्रांमध्येही याविषयी जनजागृती करावी.
कोरोना काळात मुलांना शाळेत पाठविताना पालकांची मोठी जबाबदारी आहे. मुलांना शाळेत पाठविताना पालकांनी त्यांच्याकडे मास्क, सॅनिटायझर या सुरक्षा साधनांसह कोरोनापासून बचावासाठी आवश्यक सूचनाही द्याव्यात. जेवणासाठी घरचाच डबा द्यावा. बाहेरचे खाण्यापासून कटाक्षाने मनाई करावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.