अकाेला : अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले आहे. अकाेला शहरासह चार तालुक्यांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नियमांवर बाेट ठेवून काम करू नये. शासनाची मदत करण्याची तयारी आहे. शासनाकडून येणाऱ्या निधीची तुम्ही चिंता करू नका. नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करा, अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा, अशा शब्दात पालकमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.
पालकमंत्र्यांनी शासन निर्णयांचा दिला दाखला
अतिवृष्टीमध्ये घरांचे माेठे नुकसान झाले आहे, तर अनेक गावांमधील शेती खरडून गेली असून पिके वाहून गेली. त्यामुळे प्रत्येकाला मदत मिळाली पाहिजे, मदतीपासून काेणीही वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्यावर, काही अधिकाऱ्यांनी नियमांच्या मर्यादा सांगण्यास सुरुवात करताच, पालकमंत्र्यांनी मदतीबाबतच्या शासन निर्णयांचा दाखला देत, प्रशासनालाच आरसा दाखविला. आढावा बैठकीला येण्यापूर्वी पालकमंत्री अभ्यास करून आले हाेते याची जाणीव हाेताच नियमांवर बाेट ठेवत बाेलणाऱ्या अधिकाऱ्यांचा सूर नंतर बदलला.
मोरणा नदीचे खोलीकरण अन् ड्राेनद्वारे सर्वेक्षण
अतिवृष्टीमुळे मोरणा नदीला पुन्हा पूर येऊ नये याकरिता जिल्ह्यालगत असलेल्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करा, यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा. मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, याकरिता प्रशासनाने प्राधान्याने कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.