अकोला: कारंजा येथे पार पडलेल्या विदर्भ चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याच्या टेबल टेनिसपटूंनी उत्तम कामगिरी करीत भरघोस बक्षिसे मिळविली. महिला गटात एकता घाडगे हिने दुहेरी मुकुट पटकाविला. तीन दिवसीय या स्पर्धेत विदर्भातील ३५0 च्यावर खेळाडू सहभागी झाले होते. महिला विभागात अकोला जिल्हा संघाने विविध वयोगटात विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटातदेखील अकोल्याच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.मिडगेट गटात राज कोठारी याने यवतमाळच्या तन्मय बावणेचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. कॅडेट गटात राघव नानोटे उपविजेता ठरला. युथ गटात अभिनव वाघाडेने उपान्त्यफेरी गाठली होती. पुरुष गटात अभिनव तिसर्या क्रमांकावर राहिला. महिला गटात एकता घाडगे हिने दुहेरी मुकुट पटकाविला. युथ गर्ल्स तथा महिला गटात एकता विजेती ठरली. एकताने युथ गर्ल्स गटात अकोल्याच्याच देवानी जेठवा हिचा पराभव केला. नेहा देशमुख व देवयानी व्यवहारे या दोघी युथ गर्ल्स गटात अनुक्रमे तिसर्या व चौथ्या स्थानावर राहिल्या. महिला गटात एकता घाडगे हिने आपली संघ सहकारी देवयानी व्यवहारे हिचा पराभव केला. नेहा देशमुख व देवानी जेठवा अनुक्रमे तीन व चार क्रमांकावर राहिल्या. मिडगेट मुली गटात गौरी कावळे हिने अकोल्याच्या श्रुती हातवळणे हिच्यावर अंतिम सामन्यात मात केली. कॅडेट गटात श्रुती हातवळणे हिने गौरी कावळेवर मात करीत पराभवाचा वचपा काढला.स्पर्धेचे उद्घाटन अकोला जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता व राज्य टे-टे संघटनेचे कार्यकारी सभासद गणेश मंगरूळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आयोजकांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खेळाडूंना जिल्हा टेबल-टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी महेंद्र कोठारी, अमोद कुळकर्णी, दिलीप जोगी आदींचे मार्गदर्शन लाभले.
विदर्भ स्तर टेबल टेनिस स्पर्धेत एकता घाडगेला दुहेरी मुकुट
By admin | Published: November 07, 2014 11:14 PM