जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त नऊ सदस्य पदांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सोमवार , २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सुरू झाली; मात्र दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी एकाही सदस्याचे मतदान झाले नाही.
"डीपीसी" च्या रिक्त दहा जागांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. एका जागेवर भाजपचे एक जिल्हा परिषद सदस्याची अविरोध निवड झाल्याने, उर्वरित नऊ जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. या जागांसाठी जिल्हा परिषदेचे १६ सदस्य निवडणूक लढवीत आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येत आहे. त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी एकाही सदस्याने मतदानाचा हक्क बजावला नाही. दुपारी २ वाजतापासून मतदानासाठी जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे.