अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) जिल्ह्यात ३२० खाटांची सुविधा असलेले कोविड हेल्थ केअर सेंटर्स तसेच ऑक्सिजन सुविधा, आवश्यक औषधी व अन्य उपचार सुविधांसाठी पाच कोटी चार लाख २४ हजार रुपयांची तरतूद करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचार सुविधेत कोणतीही कमतरता ठेवू नये, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हा नियोजन समितीमार्फत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील दीक्षांत सभागृहात २०० खाटांच्या कोविड हेल्थ केअर सेंटरसाठी एक कोटी ४० लाख ९६ हजार रुपये, तर ग्रामीण रुग्णालय अकोट, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शीटाकळी येथे प्रत्येकी ३० खाटांचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या शिवाय मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेल्या सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमला अतिरिक्त जोडणी बसविण्यात येणार आहे. तसेच या सर्व कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसहित सर्व सुविधांची सज्जता करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटी ६० लाख २८ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. असा एकूण पाच कोटी चार लाख २४ हजार रुपयांचा निधी कोविड उपचार सुविधांसाठी देण्यात आला आहे. त्यामध्ये ऑक्सिजन सुविधा, सिलिंडर भरणे, रेमडेसिविर इंजेक्शनसह अन्य औषधांच्या खरेदीचाही समावेश आहे.
३८० खाटांची उपलब्धता !
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील चार ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी २० प्रमाणे एकूण ८०, तर पातूर येथे ५०, पीकेव्ही येथील २०० तसेच अकोला जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरमधील ५० अशा एकूण ३८० खाटांची उपलब्धता व उपचार सुविधा निर्माण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.