अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती (ज्वाइंट ॲग्रेस्को) ची ४९ वी बैठक २४ ते ३० डिसेंबर दरम्यान आभासी माध्यमातून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे होत आहे. या ज्वाइंट ॲग्रेस्कोमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकांचे ४८ संशोधन शिफारशी सादर होणार आहे. या ठिकाणी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरित वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, मृद व जलसंधारण आदींसह अनेक महत्त्वाच्या शिफारसींबाबत बैठकीच्या माध्यमातून विचारमंथन होऊन शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या जातात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत २ पिकांचे वाण यामध्ये १ कमी कालावधीत येणार धाण व रब्बी हंगामात हुरड्यासाठी असलेले ज्वारी वाणासह कृषी तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेत. बैठकीच्या तांत्रिक चर्चासत्रात ऑनलाईन माध्यमाव्दारे चारही कृषी विद्यापीठांतील साधारणत: ३०० कृषी शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहे.