अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या गृह विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी संबंधित यंत्रणांना दिले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि काेरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, यंदा १४ एप्रिल रोजी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शासनाच्या गृह विभागामार्फत ९ एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करता, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाझरचा वापर आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस विभागासह महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार इत्यादी यंत्रणांना दिले.