अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवार, ७ जुलै रोजी दीक्षान्त सभागृहात संकरित पद्धतीने आयोजित केला आहे. यावेळी कृषी विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी दिली.
कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदन येथे बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सन्माननीय अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. मोतीलाल मदान हे उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले हे स्वागतपर भाषण करतील. पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता कृषी डॉ. ययाति तायडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे, प्रभारी संचालक संशोधन डॉ. श्यामसुंदर माने आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. दीक्षान्त समारंभाचे विद्यापीठाच्या यू-ट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
३६४६ स्नातकांना मिळणार पदव्या
या दीक्षान्त समारंभामध्ये ३६४६ स्नातकांना विविध पदव्या प्रदान केल्या जातील. यामध्ये कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्नशास्त्र, कृषी अभियांत्रिकी अशा पदव्यांचा समावेश आहे.
३१ जणांना आचार्य पदवी मिळणार
आचार्य पदवी ही ३१ जणांना दिली जाईल. समारंभात ३१ आचार्य पदवीधारक स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. याशिवाय सुवर्णपदके, रौप्यपदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करण्यात येतील.
पूनम देशमुख हिला सर्वाधिक सहा पदके
एम. एस्सी.ची विद्यार्थिनी पूनम हनुमंतराव देशमुख हिला सर्वाधिक ६ पदके प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये ५ सुवर्ण व १ रौप्यपदकाचा समावेश आहे.