सागर कुटे
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी तीन दिवसीय शिवार फेरीला सुरुवात करण्यात आली.
सकाळी ९ वाजतापासून शेतकरी नोंदणीला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी अकोला, बुलढाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. नोंदणीनंतर विद्यापीठाचे वाहनाद्वारे नियोजित २४ संशोधन विभागांना प्रत्यक्ष भेटी देण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध झाली आहे.
यंदा प्रथमच अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवाय फेरीचे नियोजन करण्यात आले असून गहू संशोधन विभागाचे २० एकर प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण २१० विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया,कडधान्य, तृणधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांचे जाती आदींचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशीचे पण प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. विदर्भासह संपूर्ण राज्यभरातून किमान ५० हजाराहूनही अधिक शेतकरी बंधू-भगिनी शिवार फेरीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.