अकोला : कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मितीसंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात सामंजस्य करार झाला. कंपनीने सहा महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कापूस पिकांमधील तणांचे नियंत्रण व वेचणीसंदर्भात हा करार करण्यात आला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात हा सामंजस्य करार ७ एप्रिल रोजी झाला. याप्रसंगी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विलास भाले, ज्योश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी कापूस वेचणीसह कीड-रोगांचे नियंत्रण, तणांचे-खतांचे नियोजन आदी मुख्य बाबींवर त्यांनी कापूस उत्पादकांच्या समस्या उलगडल्या आणि कापूस पिकामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर होण्यासाठी विविध केंद्रीय संस्था, कृषी विद्यापीठे, खासगी संस्था आदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केले. तसेच यावेळी कापूस पिकासाठी यंत्रमानव उपलब्ध झाल्यास वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी कापूस वेचणीसह तण नियंत्रणासंदर्भातील अभिनव प्रयोग विदर्भात होत असल्याचे सांगितले. ठाण्याच्या ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स या कंपनीने सहा महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी सांगितले, तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे यांनी यंत्रमानव निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला व त्यांच्या उच्चशिक्षित सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या कार्यात
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तांत्रिक सहकार्य करून सर्वार्थाने उपयुक्त यंत्रमानव निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. या उपक्रमात विद्यापीठाच्या सहयोगाने विविध तांत्रिक बाजू बळकट करण्यात येत असून माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे (सल्लागार समितीचे अध्यक्ष), डॉ. सुहास वाणी, विजय लाडोळे व अरविंद नळकांडेंसारख्या शेतीतज्ज्ञांचे पाठबळ असल्याचे उपस्थितांना सांगितले.
याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी अरविंद नळकांडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन सहसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. नीलकंठ पोटदुखे, कृषीविद्या विभागप्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रकल्पाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. शैलेश ठाकरे, तणशास्त्र तज्ज्ञ डॉ. जे. पी. देशमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी आदींची उपस्थिती होती.
ही कामे करू शकेल यंत्रमानव
कृषी यंत्रमानव हा कापसाच्या लागवडीचे पूर्ण यांत्रिकीकरण करेल, त्यात तणनिर्मूलन, कीटक रोग निर्मूलन तसेच कापसाची वेचणी ही सर्व कामे कृषी यंत्रमानव करेल, अशा यंत्रमानवाने शेतकऱ्याची हेक्टरी आर्थिक बचत होत फायदा वाढून, नवीन पिढी शेतीकडे आकर्षित होईल, असे डॉ. लोहकरे यांनी सांगितले.
जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत यंत्रमानवाची निर्मिती प्रगतिपथावर आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या तीन पेटंट्साठी कंपनीने अर्ज केला आहे. जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲॅग्रीकल्चर रोबोट हा भारतात बनणार असल्याचे डॉ.लोहकरे यांनी सांगितले.