अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पाच वृद्ध कामगारांना उपदानाची (ग्रॅज्युटी) रक्कम देण्याचा आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायधीश ए. डी. बोस यांनी दिला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला येथे १९७२ पासून वर्षानुवर्षे काम करू न नवीन वाण शोधण्याची शेतीची कामे केली जातात; परंतु कामगारांचे वय झाल्याने वयाचे ६० वर्षे पूर्ण केल्यावर सेवानिवृत्तीच्या नावाखाली पाच कामगारांना बंद केले होते; परंतु कामगारांना उपदानाची रक्कम कायद्याप्रमाणे देण्यात आली नाही. या कामगारांना उपदानाचा कायदा लागू आहे. त्याचप्रमाणे उपदानाची रक्कम कामगारांना देणे आवश्यक होते. उपदान देण्यासंबंधी अनेक वेळा कामगारांनी आंदोलने केली; परंतु कामगारांना उपदानाचे पैसे मिळाले नाही. यासाठी कामगारांनी युनियनकडे धाव घेतली. यासंदर्भात लाल बावटा युनियनच्यावतीने प्राधिकरण व कामगार न्यायालय अकोला येथे अनेक कामगारांचे प्रकरण दाखल करण्यात आले. यामध्ये सखुबाई शिरसाट (२९,०३२ रुपये), गोकर्णा दामोदर (३३,७७७ रुपये), हिरू बाई शामकुंवर (५२,२९५ रुपये), सुमन वानखडे (८७,२६५ रुपये), शकुंतला गावंडे (८२,०५५ रुपये) यांच्या प्रकरणावर निकाल देण्यात आला आहे. कामगारांच्या उपदानाची रक्कम २०१७ पासून प्राप्त होईपर्यंत दहा टक्के व्याजासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने द्यावी, असा आदेश कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश ए. डी. बोस यांनी दिला आहे.