अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मंगळवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३३ वा दीक्षांत समारंभात २,०६८ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती चंद्रकात पाटील असतील, दीक्षांत भाषण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर करणार आहेत. यावर्षी प्रावीण्यप्राप्त २९ विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी रविवारी शेतकरी सदन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.उत्तरप्रदेशच्या झासी येथील राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अरविंद कुमार तसेच महाराष्टÑ कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे यांची समारंभाला प्रमुख उपस्थिती राहील.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २०१९ मध्ये ५० वर्ष पूर्ण होत असल्याने कृषी सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी सुरू केली असून, कृषी शिक्षण,संशोधन व विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत असल्याचे डॉ. भाले यांनी यावेळी सांगितले. यावर्षी बीएससी कृषी अभ्यासक्रमाचे २,०१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उद्यान विद्या १४५, वनविद्या ३५, कृषी जैवतंत्रज्ञान ११५, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ३२, अन्नशास्त्र ६२ तर बीटेक कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या ११२ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. एमएससीचे (कृषी)२६८, उद्यानविद्या ३१, वनविद्या १२, एमटेक कृषी अभियांत्रिकी २८, एमबीए (कृषी)२५, तर पीएच.डी. चे २४ विद्यार्थी मिळून २,९०२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यातील २,०६८ विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी स्वीकारतील. यावर्षी २९ सुवर्ण, १६ रौप्य,२९ रोख व तीन पुस्तक स्वरू पात असे ७७ पदके व बक्षिसे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.एम.बी. नागदेवे,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, डॉ. वडतकर, डॉ. नितीन कोंडे, डॉ.सी.यू. पाटील यांची उपस्थिती होती.