अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत सोहळा बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी १० वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल तथा राज्यातील कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत. तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी. अलेक्झांडर यांच्यानंतर १६ वर्षांनी राज्यपाल कोश्यारी या दीक्षांत समारंभाला येत असल्याने कृषी विद्यापीठ प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत व संलग्न महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर ते आचार्य पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थी, विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यासाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. समांरभाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाते. तद्वतच पुढील वाटचालीसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. राज्यपाल समारंभाला उपस्थित राहणे कृषी विद्यापीठ व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे मानले जाते; परंतु गत १२ ते १५ वर्षांत या कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल आले नाहीत. यावर्षी राज्यपाल कोश्यारी येणार असल्याने प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या समारंभाला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष प्रा. आदित्य कुमार मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागतपर भाषण डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले करणार आहेत. उत्तराकांक्षी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू असतील, तसेच डॉ. पंदेकृवि कार्यकारी परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू आदींची उपस्थिती राहणार आहे. यावर्षीही विविध अभ्यासक्रमांच्या २ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रादन केली जाणार आहे. आचार्य पदवी प्राप्त करणाºया नवीन शास्त्रज्ञांचा यात समावेश आहे.
डॉ. पंदेकृविचा दीक्षांत सोहळा बुधवारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 11:18 AM