अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीत प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणाºया महापालिका प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. साफसफाईच्या संदर्भात शहराचे केविलवाणे चित्र ध्यानात घेता मनपाचे क्षेत्रीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक झोपेत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचे मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे धोरण असले तरी त्यांच्या उद्देशाला संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४० सफाई कर्मचारी असून, त्यांची प्रशासकीय प्रभागात विभागणी करण्यात आली आहे. तर २३ प्रभागांमध्ये (पडीत) खासगी तत्त्वावर प्रत्येकी १४ सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पडीत प्रभागात १४ पैकी केवळ ४ ते पाच खासगी कर्मचाºयांच्या माध्यमातून सर्व्हिस लाइनची थातूर-मातूर स्वच्छता केली जाते. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवक किंवा त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी मिळवले आहेत. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रभागात ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. संपूर्ण शहरातील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.लाखो रुपये कोणाच्या घशात?दरवर्षी मनपाकडून मान्सूनपूर्व नाला सफाई केली जाते. तळ दिसेपर्यंत नाल्यांची स्वच्छता करण्याचा दावा मनपाकडून केला जात असतानाच अवघ्या सहा महिन्यांतच नाले घाणीने तुंबलेले दिसतात. तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी एक मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या नाल्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला होता. नाला सफाईवर सन २०१७ मध्ये ३६ लक्ष तर २०१८ मध्ये ५९ लक्ष रुपये खर्च झाले. नाला सफाईवर लाखोंचा खर्च होत असला तरी समस्या ‘जैसे थे’ राहत असल्याने लाखो रुपये नेमके कोणाच्या घशात जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नाला सफाईच्या कामाचे ‘जीओ टॅँगिग’करण्याची गरज आहे.
आरोग्य निरीक्षक नव्हे पांढरे हत्ती!प्रभागातील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाºयानुसार काम करतात. शहरात स्वच्छतेची समस्या लक्षात घेता, आरोग्य निरीक्षक ांना निव्वळ पोसण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.