निवडणुकीच्या काळात अकोलेकरांवर आश्वासनांची खैरात करणाऱ्या सत्ताधारी भाजपने व प्रशासनाने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे पाठ फिरवली आहे. शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र पाहावयास मिळते. मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ तसेच प्रभागांमध्ये ठिकठिकाणी मोकाट जनावरांची संख्या पाहता शहरात गुराढोरांचे पीक फोफावल्याचा भास होतो. ही डाेकेदुखी दूर करण्यासाठी मनपाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या मार्गावर वाहने जपून चालवा!
जिल्हाधिकारी कार्यालय ते सर्वाेपचार
खाेलेश्वर राेड
श्रीवास्तव चाैक ते कस्तुरबा चाैक
खुले नाट्यगृह ते सांगलीवाला दुकान
सिटी काेतवाली ते शहीद अब्दुल हमीद चाैक
मोकाट जनावरांचा वाली कोण?
शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख चाैकांमध्ये माेकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याचे चित्र दिसून येते. उघड्यावरील खाद्यपदार्थ, जनता भाजी बाजारातील सडका भाजीपाला खाणाऱ्या जनावरांचा वाली काेण, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. काही पशुपालक मनपाच्या कारवाईनंतर अचानक प्रकटतात हे विशेष.
वर्षभरातील कारवाया वादाच्या घेऱ्यात
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर काेंडवाड्यांची संख्या वाढेल, असा कयास लावल्या जात हाेता. शहराचे पाच पटीने भाैगाेलिक क्षेत्रफळ वाढल्यानंतरही आजराेजी मनपाकडे सुस्थितीत केवळ दाेन काेंडवाडे असल्याची माहिती आहे. त्यातील शिवापूर येथील व जुने शहरातील शिवचरण पेठमधील काेंडवाडा अनेकदा रिकामा आढळून येताे. त्यामुळे मनपाकडून हाेणाऱ्या कारवाया वादाच्या घेऱ्यात सापडल्या आहेत.
जबाबदार काेणाला धरायचे?
काेंडवाडा विभागातील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, कार्यरत कर्मचारीही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. मागील पंधरा दिवसांपासूनच या विभागाचा कारभार माझ्याकडे साेपविण्यात आला आहे. लवकरच माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करण्यासाठी उपाययाेजना राबवली जाईल.
-अनिल बिडवे, नगरसचिव तथा आराेग्य व स्वच्छता विभागप्रमुख मनपा