दंड न भरणाऱ्या वाहन चालकांना घरपोच नोटिस
१० दिवसात दंड न भरल्यास न्यायालयात करणार खटला दाखल
अकोला : वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना दंड केल्यानंतर रक्कम जवळ नसल्याचे सांगत ती रक्कम अनपेड म्हणजेच थकीत ठेवणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक शाखेकडून घरपोच नोटीस पाठवण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यात तब्बल 40 लाख रुपयांचा दंड थकीत असून हा दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेने प्रयत्न सुरू केले आहेत. दंड न भरल्यास अशा वाहनचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंड वसूल करताना नगदी पैसे घेऊन दंडाची पावती देत असत. परंतु गैरप्रकार टाळण्यासाठी इ चालान मशीन द्वारेच दंडात्मक कारवाई करणे आवश्यक करण्यात आले आहे. ज्या मध्ये दंड, ऑनलाइन, क्रेडीट कार्ड, एटीएम कार्डद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर पैसे उपलब्ध नसतील तर अनपेडची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु ह्या सुविधेचा गैरफायदा घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दंड थकीत असणाऱ्या वाहनचालकांना आता वाहतूक शाखेने घरपोच नोटिसा पाठवल्या असून दहा दिवसांच्या आत दंड भरण्याचे आवाहन केले आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेने रेकोर्ड ब्रेक कारवाया करीत जवळपास ७५ हजार दंडात्मक कारवाया करून ८४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु तरीही जवळपास ४० लाख रुपयांचा दंड वसूल होणे बाकी राहिल्याने
शहर वाहतूक शाखेने अश्या दंड न भरणाऱ्या वाहन चालकांना लेखी नोटीस त्यांचे घरी पाठविण्यास सुरवात केली आहे. 10 दिवसात ऑनलाइन, किंवा नजीकच्या कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्याकडे क्रेडिट कार्ड/ एटीएम कार्ड किंवा नगदी दंड भरून पावती घेण्याचे नोटिसमध्ये नमूद केले आहे. 10 दिवसात दंड न भरणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
ह्या बाबत काही शंका असल्यास शहर वाहतूक शाखेत संपर्क करावा असे आवाहन शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे.
दंड भरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई व वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेला दंड भरून वाहतूक शाखेला सहकार्य करावे.
गजानन शेळके
प्रमुख वाहतूक शाखा अकोला