लोकमत न्यूज नेटवर्ककाजळेश्वर उपाध्ये : मद्यप्राशन करून भरधाव कारने काजळेश्वरच्या बापलेकीचा बळी घेणाऱ्या चालकास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी २२ फेब्रुवारी सुनावली. कारंजा तालुक्यातील ग्राम पोहा मार्गावर शिवनगर शिवारात ५ फेबुवारी २०१२ रोजी ही घटना घडली होती. काजळेश्वर उपाध्ये येथील रहिवासी तथा धोत्रा जि.प. शाळेचे मुख्याध्यापक हरिदास तुळशीराम उपाध्ये हे कुटुंबासह पोहामार्गे कारंजाकडे येत असताना ५ फेबुवारी २०१२ रोजी शिवनगर शिवारात त्यांचा मुलगा ऋषिकेश याला लघुशंका आल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्याचवेळी कारंजाकडून येणाऱ्या एम.एच.०४ एपी ७४६ क्रमांकाच्या कारचा चालक विनोद साहेबराव कोमरेकर याने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवित रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हरीदास उपाध्ये कुटुंबीयाला जोरदार धडक दिली. यामधे गाडीवर असलेली रुचा हिचा जागीच मृत्यू झाला तर हरिदास व त्यांच्या पत्नी सविता या गंभीर जखमी झाल्या होत्या. हरिदास उपाध्ये यांचा दवाखान्यात मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी कारचालक विनोद कोमरेकर याच्याविरुद्ध कारंजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर मंगरूळपीर येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी विनोद कोमरेकर याने दोन वेळा उच्च न्यायालयात तर एक वेळ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली. अतिरिक्त व सत्र न्यायालयात साक्षी व पुरावे घेण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी विनोद कोमरेकर हा दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झाल्याने अतिरिक्त व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास तसेच १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अधिक सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.
बापलेकीचा बळी घेणाऱ्या चालकास सात वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:53 AM