अकाेला : नवनवीन अत्याधुनिक महागडी वाहने ज्या वेगात खरेदी करण्यात येत आहेत त्याच वेगात अपघातांचे प्रमाणही माेठ्या प्रमाणात वाढले आहे़ यामधील जास्त अपघात हे अपघातप्रवण स्थळांवर हाेत असल्याचे समाेर आले असून त्यामुळे अकाेला जिल्ह्यातील १३१ अपघातप्रवण स्थळांवर आवश्यक त्या उपाययाेजना करून अपघात कमी करण्याचा प्रयत्न हाेत आहे़
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये २३ पाेलीस स्टेशन असून या पाेलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १३१ अपघातप्रवण स्थळे आहेत़ यापैकी बहुतांश अपघातप्रवण स्थळे म्हणजेच ४८ ठिकाणे ही अकाेला शहरातील ८ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत आहेत़ या अपघातप्रवण स्थळांवर वर्षाला १०० पेक्षा अधिक अपघात हाेत असल्याचेही आकडेवारीवरून समाेर आले आहे़ हे अपघात कमी करण्यासाठी आता पाेलिसांनी उपाययाेजना सुरू केल्या असल्या तरी त्यांच्याकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने वाहनचालकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन अकाेला पाेलिसांनी केले आहे़
शहरात ४८ अपघातप्रवण स्थळे
शहरातील आठ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल ४८ अपघातप्रवण स्थळे आहेत़ या ठिकाणी बहुतांश वेळा अपघात हाेत असून यावर उपाययाेजना म्हणून पाेलीस बंदाेबस्त लावण्यात येताे़ मात्र वाहतूक शाखेत मनुष्यबळाचा अभाव असल्याने अपघातप्रवण स्थळांवर पाहिजे त्या प्रमाणात बंदाेबस्त राहत नसल्याने तसेच सुसाट वाहनचालकांमुळे अपघात घडत असल्याचे वास्तव आहे़
पाेलीस स्टेशन हद्दीतील अपघात प्रवणस्थळे
पाेलीस स्टेशन अपघातप्रवन स्थळे
सिटी काेतवाली १२
सिव्हिल लाइन्स ०५
खदान १०
जुने शहर ०९
रामदासपेठ ०२
अकाेट फैल ०३
डाबकी राेड ०२
एमआयडीसी ०५
वाहतूक शाखेत कार्यरत अधिकारी ०३
वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी ७५
अकाेला शहरासाठी आवश्यक असलेले कर्मचारी १२५
शहरातील हे चाैक धाेकादायक
शहरातील काैलखेड, तुकाराम चाैक, रतनलाल प्लाॅट, जठारपेठ, जुने शहरातील जयहिंद चाैक, श्रीवास्तव चाैक, खडकी चाैक, जवाहर नगर चाैक, सरकारी बगीचा टी पाॅइंट, अकाेट फैल टी पाॅइंट, रेल्वे स्टेशन चाैक, अग्रसेन चाैक, टाॅवर चाैक व अशाेक वाटिका चाैकात नेहमीच गर्दी असते़ यामधील बहुतांश चाैकात पाेलीस बंदाेबस्त नसल्याने हे चाैक धाेकादायक बनत आहेत़ त्यामूळे अकाेला पाेलीस दलात आणखी मनुष्यबळाची गरज असल्याची माहिती आहे़
अकाेला पाेलिसांनी या केल्या उपाययाेजना
अपघातप्रवण स्थळ तसेच धाेकायदाक चाैकांमध्ये अतिवेगात वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघात हाेत असल्याने अकाेला पाेलिसांनी धाेकादायक वळणावर फलक लावले़ तसेच गतिराेधक तयार करण्यात आले आहेत़ दक्षता म्हणून एक पुस्तिका तयार करून त्याव्दारे या अपघात स्थळांची माहिती वाहनचालकांपर्यंत पाेहाेचविण्याचे काम पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे़
अपघातप्रवण स्थळांवरील अपघात कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात आलेल्या आहेत़ पाेलिसांसाेबत मनपा प्रशासन, बांधकाम विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनीही अपघातप्रवण स्थळांवर अपघात हाेऊ नये यासाठी उपाययाेजना करण्याचे नियाेजन केले आहे़ अपघात कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून करीत आहाेत़
गजानन शेळके
प्रमुख, वाहतूक शाखा अकाेला