लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लहान उमरी रोडवर निष्काळजीपणे वाहन चालवून तीन नागरिकांना गंभीर जखमी करणार्या तसेच एका नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालकास दोन वर्षांंची तर वाहनमालकास सहा महिन्यांची शिक्षा प्रथम श्रेणी न्यायालयाने सोमवारी ठोठावली आहे. यासोबतच अडीच लाख रुपये दंडही वाहनचालक आणि मालकास ठोठावण्यात आला असून, ही रक्कम पीडितांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्यांनी दिले.लहान उमरीतील रेल्वे लाइनजवळ ३0 डिसेंबर २00६ रोजी सकाळी दहा वाजता एमएच-३0-पी-६0९५ क्रमांकाच्या टाटा सुमोच्या चालकाने बेजबाबदारपणे व भरधाव वेगात वाहन चालवून सायकलस्वार बाबुसिंग गोविंदराव सूर्यवंशी, गजानन वानखडे, राजेश आत्माराम वानखडे यांना जबर धडक दिली होती. या धडकेत ते तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांनाही सवरेपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान, बाबुसिंग सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी जीवन श्यामराव डिगे यांच्या तक्रारीवरून वाहनचालक जगदीश काशिनाथ वाकोडे आणि वाहनमालक धमेंद्र हिंमत किर्तक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. वाहनचालक जगदीश वाकोडे याला दोषी ठरवित दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच मालक धमेंद्र किर्तक यास सहा महिन्यांची शिक्षा आणि पीडितांना अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईतील दीड लाख रुपये रक्कम मृतक आणि उर्वरित रक्कम दोन्ही जखमींना म्हणजेच प्रत्येकी ५0 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
‘त्या’ वाहनचालकास शिक्षा
By admin | Published: June 20, 2017 4:45 AM