रामदास पेठ व जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यभर कोरोनाचे थैमान सुरू असून, अकोला शहरासह जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी मोहीमच पोलिसांनी हाती घेतली आहे. मात्र, तरीही काहीजण विनाकारण फिरत असल्याने शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आता सोमवारपासून ड्रोन कॅमेराद्वारे गस्त घालण्यात येत आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची दुचाकी जप्त करणे तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे गस्त घालण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अकोला शहरात जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौक, किल्ला चौक व वाशीम बायपास परिसरात गस्त घालण्यात आली. त्यानंतर रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रशेखर आझाद चौकात शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेराद्वारे गस्त घालण्यात आली. या दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर नजर ठेवण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती घरून निघाल्यानंतर कोणत्या ठिकाणावर गेला आणि परत कुठे गेला, याची संपूर्ण माहिती या गस्तीदरम्यान ठेवण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्या दुचाकीचा क्रमांक घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सोमवारीही गस्त घालण्यात आली. त्यानंतर आता आणखी ड्रोन कॅमेरे वाढविण्यात येणार असून, शहराच्या मुख्य चौकात तसेच वर्दळीच्या ठिकाणी कॅमेऱ्याद्वारे गस्त घालण्यात येणार आहे.