सत्यशील सावरकर
तेल्हारा:
शासन निर्णयानुसार ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करण्याचे काम सुरू झाले असून तालुक्यातील ८१ गावांत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. सर्व्हेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मिळकतीचे सिमांकन व गाव हद्द पाहून ड्रोन सर्व्हेसाठी यंत्रणा स्वामीत्व योजनेअंर्तगत गावठाण जमाबंदी प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोनद्वारे गावठाण भूमापन योजनेची जिल्हा संनित्रयण व अंमलबजावणीचे ठरल्याप्रमाणे नियोजन केले. त्यानुसार सर्वेक्षण सुरू झाले आहे. गावठाण जमाबंदी प्रकल्प अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यापासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील ८६३ गावांचे गावठाणाचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. तालुक्यातील ८१ गावांचे गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणीचे काम सुरु आहे. सर्व्हे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तेल्हारा तालुक्यातील गावांचे गट पाडून त्यासाठी समन्वय अधिकारी व कर्मचारी पथक तयार केले आहेत. त्यामध्ये बी.एम. भावसार, व्ही.के.राणे, पी. एस. पाटील, व्ही. के. पाटील, संतोषकुमार सैतवाल, रवींद्र खाटोटे, बी. जी. खंडेलवाल, नितीन अटाळे व राखीव पथकामध्ये गजानन सहारे व भूमापक कर्मचारी यांची नेमणूक केली असून तालुक्यात सर्वेक्षण सुरू झाले आहे.
गावठाण जमाबंदी योजना ड्रोनद्वारे पूर्ण करण्यात येणार असून, ड्रोन उडानाच्या अगोदरच्या दिवशी १० सें.मी.जाडीच्या चुन्याच्या रेषाद्वारे मिळकतीचे सिमांकन करणे आवश्यक आहे. योजनेत जनतेने आपल्या खासगी मिळकतीचे सिमांकन ग्रामसेवक व भूमापक यांच्या मार्गदर्शानात पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व नागरिकांनी या योजनेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासकीय मिळकती, रस्ते, सार्वजनिक मिळकती, ग्रामपंचायत मिळकतीचे सिमांकनचे काम ग्रामसेवकांनी भूमापक यांच्या मदतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. योजनेंतर्गत ग्रामीण भागाचा कायापालट होणार असल्याने नागरिकांनी योजनेत सक्रिय सहभाग घेऊन योजना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.