संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : पातूर तालुक्यातील गावातील शेती आणि शेतमजुरीचा पारंपरिक व्यवसाय दुष्काळामुळे संपुष्टात आल्याने भंडारज बु.च्या १६ कुटुंबातील ७६ शेतकरी व शेतमजुरांनी जड अंत:करणाने गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद आणि सुरतच्या दिशेने स्थलांतर केल्याची माहिती आहे.भंडारज बु.सह संपूर्ण तालुक्यात यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. शेतकर्यांनी शेतात पेरलेल्या उडीद, मूग, सोयाबीन पिकाचे पावसाअभावी कमालीचे नुकसान झाले. अनेकांना एकरी केवळ २0 किलो सोयाबीनचे उत्पादन हातात आले. मशागत, पेरणी, सोंगणीवर केलेला खर्च संपूर्ण वाया गेला. अनेकांना उत्पन्न एक छदामही झाले नाही. त्यामुळे,खर्चाचा संपूर्ण ताळेबंद बिघडला. शेतकरी शेती उत्पन्नाच्या आधारावर शेतमजुरांना शेतात काम देत होता; मात्र हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या खिशात काहीच आले नसल्यामुळे शेतमजुरांचे शेतीतील काम संपुष्टात आले. खरिपातील वाईट अनुभवानंतर रब्बी हंगामात शेतीची पेरणीपूर्व मशागत करून हरभरा, गहू, कांदा बागायती पिके काढण्यासाठी पेरणी केली; मात्र विहिरीतील पाणी पातळी खोल जाऊन सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा भूगर्भात राहिला नसल्याने पेरलेली रब्बी पिकेसुद्धा संपुष्टात आली. गतवर्षी विलास जयराम इंगळे यांना २५0 क्विंटल कांदा पीक आले होते. यावर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही पिके बुडाली. परिणामी, भंडारज बु.च्या अल्पभूधारक शेतकर्यांना स्वत:च्या घराला कुलूप लावून बायका-पोरांना घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईसह इतर शहरे गाठावी लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने विलास जयराम इंगळे, दीपक व्यंकट इंगळे, जिझासुमत नारायण इंगळे, सविता बाळू खंडारे (विधवा महिला), रामेश्वर वसंता सुरवाडे, माणिक संपत इंगळे (वायरमन), भगवान वानखेडे (गवंडी काम), चंद्रशेखर चौथमल, शेतमजूर, सुधाकर मनोहर तेलगोटे, देवलाल पंजाब भोजने, उमेश साहेबराव सुरवाडे, संदेश भगवान शिरसाट, विनोद रामराव इंगळे, सीमाबाई सीताराम इंगळे, सतीश पंजाब घायवट, विद्याधर साहेबराव सुरवाडे आदींचा समावेश आहे. हे सर्व हरियाणाला गेले. अजय दत्ता अवसरमोल, प्रकाश महादेव गव्हाळे, आकाश उमेश भदे, अजय बाळू अरखराव, विनोद श्रीकृष्ण गव्हाळे, सोपान उकर्डा गव्हाळे, भिकाजी सीताराम इंगळे, प्रमोद रामभाऊ गव्हाळे, अक्षय गजानन भांगे, सतीश माणिकराव इंगळे, प्रवीण केशव इंगळे, संतोष लक्ष्मण इंगळे, बाळू निरंजन सुरवाडे, पंकज महादेव गव्हाळे हे शाळकरी महाविद्यालयीन युवक शिक्षण अध्र्यावर सोडून रोजगाराला गेले आहेत. भंडारज बु.च्या ७६ हून अधिक कुटुंबांनी घराला कुलूप ठोकून गाव सोडले आहे. उर्वरित शेतकरी शेतमजुरांची कुटुंबे रोजगारासाठी गाव सोडण्याच्या तयारीत आहेत. ही दुरवस्था नेहमी मराठवाड्यात पाहायला मिळते; मात्र पाणीच नसल्याने स्थलांतर करण्याची पातूर तालुक्यातील भंडारज बु. या गावावर पहिल्यांदा वेळ आली आहे. तेच विदारक चित्र तालुक्यातील अनेक गावांचे होण्याची शक्यता अधिक आहे.
गावातील शेतकरी आणि शेतमजुराला पाणीच नसल्याने रोजगार नाही. शासनाने दुष्काळी परिस्थितीत कामांना तत्काळ सुरू करण्याची गरज आहे, अन्यथा गाव ओस पडणार आहे. शेतीवर आधारित जीवनचक्र दुष्टचक्र बनले आहे. सरकारने जलद गतीने पावले उचलण्याची गरज आहे.- दीपक इंगळे, शेतकरी तथा माजी सरपंच भंडारज बु.
शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत ८४ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येतील. पाणीटंचाई आणि चाराटंचाईबाबत गटविकास अधिकारी यांचा अद्यापही कोणताही अहवाल प्राप्त नाही. - डॉ. आर. जी. पुरी, तहसीलदार पातूर.