- संतोष येलकरअकोला : पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व पेरणी क्षेत्रासंदर्भात संबंधित यंत्रणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळाच्या छायेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात गत १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ७०१.६ मिलीमीटर पाऊस पडला असून, एकूण खरीप पेरणीच्या क्षेत्रापैकी ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पडलेला पाऊस, जमिनीतील आर्द्रता, भूजल पातळी व एकूण पेरणीच्या क्षेत्रापैकी पेरणीचे प्रत्यक्ष क्षेत्र यासंदर्भात कृषी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि महसूल विभाग इत्यादी यंत्रणांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ११ सप्टेंबर रोजी अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी आणि पेरणी क्षेत्राचे प्रमाण विचारात घेता, जिल्ह्यातील अकोट आणि पातूर हे दोन तालुके वगळता इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पाचही तालुक्यांवर दुष्काळाची छाया असल्याचे वास्तव समोर येत आहे.दुष्काळाच्या छायेत असे आहेत पाच तालुके!पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी व खरीप पेरणी क्षेत्राचे प्रत्यक्ष प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पडलेला पाऊस, आर्द्रता, भूजल पातळी आणि एकूण खरीप पेरणीच्या क्षेत्रापैकी प्रत्यक्ष पेरणी क्षेत्राचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता इतर पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.- राजेश खवले,निवासी उपजिल्हाधिकारी.