अकोला : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाच्या भेटीसाठी पश्चिम वर्हाडातील शेतकरी आतूर झाले होते. या उच्चस्तरीय पथकासमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी ठिकठिकाणी आतुरतेने जमलेले शेतकरी आणि पथकातील अधिकार्यांना मात्र दौर्याची औपचारिकता आटोपण्याची घाई, असेच काहीसे चित्र सोमवारी पश्चिम वर्हाडात दिसले. केंद्रातील सचिवस्तरीय अधिकारी प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय पथकाने सोमवारी पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांना भेट दिली. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथे दुपारी १ वाजता, लोणार तालुक्यातील अंजनीखुर्द गावास दुपारी ४ वाजता, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील इरळा येथे सायंकाळी ७ वाजता, तर अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर येथे रात्री ९ वाजता पथकाने भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. केंद्रिय पथकाने पश्चिम वर्हाडातील तिन्ही जिल्ह्यांचा दौरा दिवसभरात गुंडाळला. जालन्याहून बुलडाण्याकडे निघालेले हे पथक रस्ता भरकटले आणि दौरा सुरूवातीपासूनच जवळपास चार तास उशिरा चालला. त्यामुळे पथकाच्या प्रतिक्षेत शेतकर्यांना ताटकळत बसावे लागले. बुलडाणा जिल्ह्यातील माळसावरगाव आणि अंजनी खुर्द या पहिल्या दोन गावांना पथकाने अनुक्रमे एक आणि अर्धा तास दिला. बुलडाण्यातून वाशिम जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पथकाने शेतकर्यांना पुरेसा वेळ देण्याचे टाळले. या जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील इरळा आणि कारंजा तालुक्यातील धोत्रा जहांगिर गावास पथकाने अनुक्रमे अवधी १५ मिनिटं दिली. अकोला जिल्ह्यासही या पथकाने अवघी १७ मिनिटंच दिली. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील नागोला मलकापूर या गावात हे पथक पोहोचले, तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. पथक पोहोचल्यानंतर जवळपास तीन ते चार मिनिटं अधिकार्यांसाठी खुच्र्या लावण्यात गेले, तीन मिनिटं गावच्या सरपंचाच्या भाषणात, नंतरची तीन ते चार मिनिटं त्यांच्या स्वागतात आणि उरलेली अवघी पाच मिनिटं शेतकर्यांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मिळाली.
कोणत्या गावाला, किती वेळ?
अंजनी खुर्द (बुलडाणा) - ३0 मिनिटं
माळसावरगाव (बुलडाणा) - ६0 मिनिटं
इरळा (वाशिम) - १५ मिनिटं
धोत्रा जहाँगिर (वाशिम) - १५ मिनिटं
नागोला मलकापूर (अकोला) - १७ मिनिटं