लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : मागील सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे राहिले आहे. खरिपाची अंकुरलेली पिके वाचविण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.पातूर तालुक्यात जून महिन्याच्या ८ ते १० जूनपर्यंत तीन दिवस दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जूनच्या १५ ते २० तारेखेपर्यंत तालुक्यात शेतकऱ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी केली होती. त्यानंतर १० जूननंतर तुरळक स्वरूपात पाऊस पडला. यादरम्यान बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीच्या दमदार पावसाने व त्यानंतर आलेल्या तुरळक स्वरूपाच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर इत्यादी खरीप पिकाचे बीज अंकुरण्यास सुरुवात होऊन रोपे वर आली होती. सुरुवातीच्या पेरणीचे लहान रोपेसुद्धा डोलू लागली होती; परंतु मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोपे सुकू लागली आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे कडक ऊन तापत असल्याने जमिनीतच कोमेजून गेले. अशा स्थितीत आता दुबार पेरणी करण्याची पाळी बऱ्याच शेतकऱ्यांवर आली आहे.पावसाने दडी मारल्याने व कडक ऊन तापत असल्याने रोपे सुकण्याची व बियाणे जमिनीतच कोमेजण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे दुबार पेरणीची पाळी आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च तर परवडणारा नाही. त्यांच्यावर आधी केलेल्या पेरणीचा खर्च वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या तीन-चार वर्षांतील नापिकी व शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे आधीच शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच १५ दिवसांपासून पाऊस न आल्याने शेतकरी आणखी चिंतातुर झालेले आहेत. सद्यस्थितीत दमदार पावसाची प्रतीक्षा असून, सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. नया अंदुरा परिसरातील पिके धोक्यात!जून महिन्याच्या शेवटी शेवटी झालेल्या पावसावर परिसरातील नया अंदुरा, हाता, कारंजा (रम.), निंबा, अंदुरा, शिंगोली, कवठा, बहादुरा परिसरातील पेरणी झाली असून, त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी सात-आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थवाहणी म्हणून ओळखल्या जातो, त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. सर्व शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे जूनमध्ये पावसाचे आगमन झाले, त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहित धरून अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या या पावसानंतर अधूनमधून पावसाचा शिरकाव झाला; परंतु पिकांना पोषक पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके धोक्यात सापडलेली आहेत.परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीला प्राधान्य दिले आहे. कापसापाठोपाठ सोयाबीन, तूर आणि उडीद, मुगाची पेरणी झाली आहे; परंतु पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. पाऊस चक्क गायब झाला आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मुबलक पावसाची गरज आहे; परंतु पाऊस होत नसल्याने ही पिके वाढण्याऐवजी रोगाला बळी ठरत आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरून आहेत. येत्या आठ दिवसात दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकेत शेतकऱ्यांवर ओढवू शकते.
दुबार पेरणीचे संकट!
By admin | Published: July 07, 2017 1:35 AM