खामगाव : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३0 वाजेच्या सुमारास घडली. स्थानिक बाळापूर फैलातील जयराज ईश्वर जाधव (२४) हा मंगळवारी त्याच्या मित्रांसोबत खामगाव-बाळापूर रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक विहिरीत सकाळी ११ वाजेच्या सुमारास पोहण्यास गेला होता; मात्र पोहत असताना बराच वेळ उलटूनही जयराज हा पाण्याबाहेर न आल्याने मित्रांनी पाण्यात शोधाशोध केली; मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत पोहत असणार्यांनी विहिरीबाहेर येवून याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांना दिली; तसेच या घटनेची माहिती पोलिसांना व नगर परिषदेच्या अग्निशमक विभागाला देण्यात आल्यानंतर पोलीस तसेच अग्निशमक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमक विभागाने विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला; मात्र त्याला यश आले नाही. जयराजचा मृतदेह कपारीत अडकल्याच्या शक्यतेमुळे गणेश सोनोने, अमोल सरकटे, शेख शकील, आशिष धुंदळे यांनी विहिरीत उतरुन शोध घेतला असता जयराजचा मृतदेह आढळून आला. त्यांनी हा मृतदेह बाहेर काढला. मृतक जयराज जाधव हा स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करीत होता. तर त्याचे यावर्षी लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई, पत्नी व भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांनी या विहिरीमध्ये दरवर्षी बळी जात असल्याने विहीर बुजविण्याची मागणी केली.
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
By admin | Published: September 09, 2015 1:57 AM