अकोला : सध्या साथीच्या आजारांनी रुग्ण त्रस्त असून, सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची झुंबड आहे. अशातच औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने जीएमसीत रुग्णांवर विनाऔषध उपचार सुरू आहेत. परिणामी, गरीब रुग्णांना औषधांसाठी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.खासगी दवाखाना किंवा रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नाही, म्हणून हजारो रुग्ण दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथे अत्यल्प खर्चात त्यांच्यावर उपचार होत असून, नियमानुसार नि:शुल्क औषधही दिले जाते; मात्र गत काही दिवसांपासून येथे येणारा रुग्ण उपचारानंतर थेट खासगी औषध केंद्रावर औषधी खरेदी करताना दिसून येतो. या रुग्णांशी संवाद साधला असता, उपचार स्वस्तात मिळाला, तरी सर्वोपचार रुग्णालयात औषधीच उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शिवाय, उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनदेखील डॉक्टर बाहेरूनच आणायला सांगत आहेत. खासगीत उपचार परवडत नाही म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथेही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संस्थेतर्फे सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकासाठी ही घोषणा दिली होती; परंतु वास्तविकता यापेक्षा उलट असल्याचे निदर्शनास येत आहे.रुग्णांना सहकार्याचे आवाहनगत वर्षभरापासून सर्वोपचार रुग्णालयात हाफकीनकडून औषधी पुरवठ्याची समस्या सुरू आहे. मध्यंतरी तीन महिने औषधसाठा उपलब्ध असल्याने रुग्णसेवा सुरळीत सुरू होती; परंतु हाफकीनकडून औषधी पुरवठा पुन्हा खंडित झाल्याने बहुतांश औषधसाठा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रुग्णांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करणारे सूचना फलक रुग्णालय प्रशासनातर्फे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत.काही औषधांचा तुटवडा आहे. त्यासंदर्भात हाफकीनकडे मागणी करण्यात आली असून, पत्रव्यवहार करणे सुरू आहे. हाफकीनकडून औषधसाठा उपलब्ध झाल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.