अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत डाबकी रोडवर कार चालवित धिंगाणा घातला. यामध्ये ११ जण जखमी झाले असून, तिघे गंभीर आहेत. अपघातानंतर घटनास्थळावर दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. डाबकी रोडवरील रहिवासी असलेल्या अनिल चव्हाण नामक युवकाने मद्यधुंद अवस्थेत एम एच ३0 एएफ ८0२0 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार चालवित डाबकी रोडवरील ऑटो, सायकलरिक्षा व पाणीपुरीच्या गाड्यांना जबर धडक दिली. दारूच्या नशेत तर्र्र असल्याने चव्हाणचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने या रोडवरील वाहनांना चिरडले. या अपघातात रामदास पेठमधील रहिवासी रितेश सांगाणी व आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले असून, ५ ते ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अजय चव्हाणने स्विफ्ट कार बेदरकारपणे चालवित डाबकी रोड पोलीस ठाणे ते श्रीराम टॉवरपर्यंत अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर एका विद्युत खांबाला त्याची कार धडकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला चांगलाच चोप दिला. मात्र, चव्हाणने कारमध्ये घुसून कार आतून बंद केली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कारवर दगडफेक सुरू करताच डाबकी रोड पोलिसांनी घटनास्थळ गाठून सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या मद्यधुंद कारचालकामुळे तिघे जण गंभीर जखमी असून, पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कारच्या धडकेत ३ ऑटोंसह, सायकलरिक्षा, दुचाकी व पाणीपुरी चालकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या प्रकरणी जखमी झालेल्यांनी कारचालकाविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी जखमींच्या नातेवाईकांना प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली.
मद्यधुंद कार चालकाचा थरार
By admin | Published: July 25, 2015 1:54 AM