उरळ : काम शोधण्यासाठी बोरवाकडी रस्त्याने जात असताना, एका निष्पाप शेतमजुरास मद्यधुंद दारुड्याने अडवून विनाकारण त्याला शिवीगाळ केली. शेतमजुराने शिवीगाळ केल्याबद्दल जाब विचारला असता, त्याने पºहाटी उपटण्याचा लोखंडी चिमटा त्याच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी गायगावजवळील बोरवाकडी शेतशिवारात घडली. जखमी शेतमजुराचा सोमवारी दुपारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात उरळ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी गोपाल ओंकार आगरकर (गायगाव) याला अटक केली.सविता रामेश्वर वाकडे (२६) यांच्या तक्रारीनुसार ते अडगाव येथे राहणारे असून, पाच ते सहा वर्षांपूर्वी ते कामधंद्यानिमित्त गायगाव येथे स्थायिक झाले. त्यांचे पती रामेश्वर देवानंद वाकडे (३५) आणि दोन मुले व एक मुलगी असे गायगाव येथे राहतात.
पती रामेश्वर वाकडे हे डेपोवरील टँकरवर क्लिनरचे काम करतात; परंतु ते काम बंद असल्यामुळे पती रामेश्वर वाकडे १0 मे रोजी दुपारी मनाडी शेतशिवारात शेतमजुरीचे काम शोधण्यासाठी गेले होते. दरम्यान, गावातील सुधाकर रनवरे हे घरी आले आणि त्यांनी, बोरवाकडी शेतशिवारातील अब्दुल कादर यांच्या शेताजवळ पती रामेश्वर आणि आरोपी गोपाल आगरकर यांच्यात वाद सुरू असून, त्याने रामेश्वर याला पºहाटी उपटण्याच्या लोखंडी चिमट्याने डोक्यावर मारले असून, तो जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती सांगितली. त्यामुळे सविता वाकडे आणि तिचे वडील विष्णू थोटे (रा. गायगाव) यांना घेऊन बोरवाकडी शिवारात गेल्यावर, रामेश्वर वाकडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु ११ मे रोजी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सविता वाकडे यांच्या तक्रारीनुसार आरोपी गोपाल ओंकार आगरकर याने मद्यधुंद अवस्थेत पतीसोबत विनाकारण वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. पतीने त्याला जाब विचारला असता, त्याने लोखंडी चिमटा डोक्यावर मारून त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात उरळ पोलिसांनी आरोपी गोपाल आगरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)