लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कौलखेड मार्गावरील शीतला माता मंदिरालगत असलेल्या खदानीतील वाळलेले गवत पेटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेतील पेटलेले गवत विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले. मुख्य मार्गाच्या कडेला असलेल्या या खदानीलगत दाट वस्ती आहे. पेटलेल्या गवतामुळे धुरांचे लोळ परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच एक एक करून महापालिकेचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. मधोमध पेटलेल्या गवतावर पाण्याचा मारा करण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, तर हा प्रकार पाहण्यासाठी खदानीच्या काठावर नागरिकांनी गर्दी केली होती. यापूर्वीसुद्धा तीन-चारदा या खदानीतील वाळलेल्या गवताने पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे महापालिका प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खदानीतील वाळलेले गवत पेटले!
By admin | Published: July 08, 2017 2:01 AM