अकोला: मृग, रोहिणी नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची आशा ‘आर्दा’वर होती. आर्दा नक्षत्राला सुरुवात होताच जिल्ह्यात मान्सूनची सर कोसळली. त्यात जून महिना संपत आल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सून येणार या आशाने कोरड्यातच कपाशीची लागवड सुरू केली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ९ हजार ६११ हेक्टरवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी उरकली असून, त्यात सार्वाधिक कपाशीची लागवड झाली आहे. आगामी दिवसात पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. पुरेसी ओल झाल्याशिवाय, तसेच ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कपाशीची ९ हजार ४६९ हेक्टरमध्ये लागवड
जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार ६११ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,४६९ हेक्टरमध्ये कपाशी, १३५ हेक्टरमध्ये सोयाबीन व ७ हेक्टरमध्ये तूरीची पेरणी झालेली आहे. त्यामध्ये सार्वाधिक पेरणी तेल्हारा व बार्शीटाकळी तालुक्यात झाली आहे.
९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या
मान्सून सक्रीय झाल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वार्तविला होता. मात्र मंगळवार, बुधवार दिवस पावसाविना गेल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. आगामी दिवसात पाऊस न आल्यास पेरण्या उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत सरासरी क्षेत्र ४ लाख ५६ हजार १५५ हेक्टरपैकी केवळ २ टक्के म्हणजे ९ हजार ६११ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. पावसाने खंड दिल्याने ९८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत.
अशी झाली पीक निहाय पेरणी
पीक पेरणी क्षेत्र (हेक्टर)ज्वारी ००
तूर ०७मूग ००
उडीद ००सोयाबीन १३५
कापूस ९,४६९----------------------------
एकूण ९,६११